मुंबई वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, हे बिनखात्याचे सरकार आहे. मुख्यमंत्री हे मंत्र्यांकडे कोणती खाती आहेत ते सांगू शकत नाहीत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे का हे त्यांना माहीत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबत तर सगळी बोंब आहे. 40 जणांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. कोणी कोणत्या खात्याची उत्तर द्यायची याची माहिती नाही. सगळीच उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत का, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.
कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यात प्रश्न निर्माण झाले आहेत. आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. विधानसभेत आमचे विरोधी आमदार कमी असले तरी ते दमदार आहेत असे सांगत विरोधक आक्रमक होणार. काहीजण मंत्रिपद न दिल्याने नाराज झाले आहे. काहीजण नागपूर सोडून गेले. आमदार रवी राणा यांचे नावदेखील ऐकले होते. पण ते देखील अमरावतीला माघारी गेले. जे आमच्याकडून गेले ते सत्ता, पद आणि पैशांसाठी गेले हे स्पष्ट आहे. भुजबळांना वगळण्यात जातीय राजकारण असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली. ते आपापल्या कर्माची फळं भोगत असल्याचेही राऊत यांनी सांगितले. भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टोलेरन्सचा मुद्दा मांडत होते. आता त्यांनी राज्यात झिरो टोलेरन्स राबवलं तर 90 टक्के मंत्रिमंडळ रिकामे होईल असा टोलाही राऊतांनी लगावला.