मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उघडपणे ‘आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ’, असे म्हणत मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे हे काँग्रेसच्या वाटेवर होते, असा दावा संजय राऊत यांनी केल्याने आता मोठी चर्चा रंगली आहे. ‘एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी चर्चा झाली होती.’, असा दावा संजय राऊतांनी केला.
नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर बोलताना संजय राऊतांनी हा दावा केला. मात्र, एकीकडे संजय राऊतांना असा दावा केला असला तरीही दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे. नाना पटोलेंच्या ऑफरवर बोलताना राऊत म्हणाले की, नाना पटोले आमचे सहकारी आहेत. जेष्ठ नेते आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. दरम्यान, संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या दाव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची काल पिलेली भांग अजून उतरलेली दिसत नाही, अशा शब्दात म्हस्के यांनी टीका केली आहे. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, मग तुम्ही त्यांना मंत्री का बनवले? असा सवाल देखील त्यांनी विचारला.