ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संतोष देशमुख हत्या प्रकरण : देशमुखांना २० कोटींच्या ऑफरचा व्हिडिओ व्हायरल ; बीड जिल्ह्यात खळबळ !

बीड : वृत्तसंस्था

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण, सोशल मीडियावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना कथितरित्या 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही ऑफर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही चर्चा शासकीय अंगरक्षक संतोष जाधव यांच्या उपस्थितीत झाल्याचंही सांगितलं जात आहे.

मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप तपासात असून कोणत्याही अधिकृत वृत्तसंस्थेने किंवा पोलिसांनी त्याची पुष्टी केलेली नाही. तरीदेखील या व्हिडिओमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुष अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह गावाजवळ सापडला होता. तपासादरम्यान धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या खंडणी रॅकेटचा या हत्येशी संबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून, प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात, तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं होतं. फक्त ८० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. तपासादरम्यान आरोपींनी केलेल्या अत्याचारांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पोलिसांच्या ताब्यात आल्याचं सांगण्यात आलं. या घटनेने केवळ बीडचं नव्हे, तर संपूर्ण राज्याचं राजकारण हलवून सोडलं होतं. या प्रकरणाचा सर्वाधिक राजकीय फटका तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना बसला. त्यांचं नाव थेट तपासात आलं नव्हतं, तरी निकटवर्तीय कराडवर गुन्हा दाखल झाल्याने मुंडेंवर गंभीर आरोप झाले. वाढत्या दबावामुळे अखेर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आता पुन्हा समोर आलेल्या २० कोटींच्या कथित ऑफरच्या व्हिडिओमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बीड जिल्ह्यात आणि राज्यभरात या व्हिडिओबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तपास यंत्रणा आता या व्हिडिओची सत्यता आणि त्यामागचं राजकारण याची चौकशी करणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण संपलं नाही, उलट आता त्याचं राजकीय आणि आर्थिक संबंधांचं नवं पान उघडलं गेल्याची चर्चा बीड जिल्ह्यात रंगत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!