अक्कलकोट : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील एका सहा वर्षीय चिमुकलीला उपचारादरम्यान ब्लड कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत म्हणून चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी मनीषा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून ३० हजार रुपयांची आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे. याबाबतचा धनादेश तिच्या पालकाकडे सरपंच पाटील यांनी सुपूर्द केला.
परिस्थिती हलाखीची असली की कुणालाही वैद्यकीय खर्च झेपणे मुश्किल होते. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या संस्था किंवा ज्या व्यक्ती काम करतात त्यांच्याकडे ही मंडळी आशेने बघतात. परंतु ज्यावेळी पाटील यांना हि बाब कळली तेंव्हा पाटील यांनी स्वतःहून त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या कार्यालयात त्यांना बोलून मदत केली आहे.
एका गरीब सर्वसामान्य कुटुंबातील अभिमान जाधव यांची मुलगी कादंबरी जाधव हिच्या बाबतीत ही घटना घडली आहे. तिच्यावर अजूनही उपचार सुरू असून अन्य कुणालाही तिला मदत करायचे असल्यास संबंधितांनी जाधव यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत बोलताना सरपंच पाटील म्हणाले की, समाजामध्ये अनेकांकडे पैसा असतो पण प्रत्येक जणांचा दृष्टिकोन असा नसतो समाजामध्ये जन्माला आल्यानंतर आपण समाजासाठी काहीतरी ऋण फेडावे. या हेतूने आपण काम करतो. ही रक्कम फार मोठी नसली तरी याची संकटकाळी त्यांना खूप मोठी मदत झाली आणि ती केली याबद्दल समाधान वाटते.
यावेळी गणेश ऍग्रो सर्व्हिसेस मोडनिंबचे दत्ताञय सुर्वे, चपळगाव तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील, कंपनीचे चंद्रशेखर गुंडला,सुरेश सुरवसे, अंबण्णा अचलेरे आदी उपस्थित होते.