नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचे नाव आहे. वैभव गहलोत यांना राजस्थानच्या जालोरमधून, तर नकुलनाथ यांना मध्य प्रदेशच्या छिंदवाडातून उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आसामच्या जोरहाट येथून निवडणूक लढतील. दोन दिवसांपूर्वीच भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले खासदार राहुल कस्वा यांना चुरू येथून तिकीट देण्यात आले आहे. राहुल सध्या याच मतदारसंघाचे खासदार आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १० उमेदवार सामान्य प्रवर्गातील, तर ३३ जण अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व अल्पसंख्याक समाजातील आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने सोमवारी बैठक घेऊन दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित केली होती.