मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसावर विधानसभा निवडणूक येवून ठ्पल्या असून त्या अनुषंगाने सर्वक्ष पक्षांकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, अशी ऑफर भाजपने दिली होती. पण त्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, असे संजय शिरसाट म्हणाले. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात ठाकरेंच्या भूमिकेवर खमंग चर्चा रंगली आहे.
संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यावेळी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यावेळी सर्व काही ठरले होते. पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देण्याचेही भाजपने मान्य केले होते. परंतु चर्चा करण्यासाठी कुणीतरी एकजण पाठवा, असे भापजने सांगितले होते,असा दावा शिरसाट यांनी केला. परंतु, उद्धव ठाकरे यांनी चर्चेला माणूस पाठवला नाही. एकनाथ शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, तुला जायचे तर तू जा असे एकनाथ शिंदेंना म्हणाले. भाजपसोबत जायचे नव्हते, तर मग इतका आटापिटा का आणि कशासाठी केला होता, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पदासाठीच हे सर्व केले आणि त्याला संजय राऊत कारणीभूत आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांना परत घेऊ पण निघून गेलेल्या आमदारांसाठी परतीचे दोर कापले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रवेश सोहळ्यात म्हटले होते. त्यावर देखील संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. परतीचे दोर कापायला तुमच्याकडे कुणी आले पाहिजे, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे यायला कोण तयार आहे. डुबणाऱ्या पक्षाकडे कुणीही जात नाही. नगरसेवक किंवा कार्यकर्ता आला असेल, तो देखील उमेदवारीचे तिकीट घेऊन आला असेल. त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला तुमच्या दरवाजा किंवा पक्षात यायचे नाही, असे शिरसाट म्हणाले.