मुंबई : एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून दोन दिवस उसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ नोव्हेंबर आणि १८ नोव्हेंबर रोजी उसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. या दोन दिवसात कारखाने सुरू ठेवल्यास संघर्ष होईल असा इशारासुद्धा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत एफआरपी अधिक ३५० रुपये दर देण्याची मागणी केली होती. तसंच साखरेला प्रतिटन २ हजार ५०० रुपये दर मिळावा आणि इथेनॉलला प्रतिलीटर पाच रुपये दर वाढवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केंद्र सरकारकडं केलं आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात यावा. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील कायदा मंजूर करावा. एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारले आहे. दोन दिवस कारखाने बंद ठेवावेत अन्यथा संघर्ष होण्याची शक्यता आहे असा इशारा कारखानदारांना देण्यात आला आहे.