ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांचे निधन ; उद्या होणारे पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांचे कनिष्ठ बंधू दत्तात्रय शरणप्पा तानवडे यांचे मंगळवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून पुणे व सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता शिरशी येथील वागदरी- अक्कलकोट रोड लागत असलेल्या तानवडे मळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रशांत, प्रवीण असे दोन मुले,प्राजक्ता एक मुलगी आणि पत्नी निर्मला व सुना, नातवंडे असा परिवार आहे.

भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व युवा मोर्चाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रसन्न तानवडे यांचे ते काका होते. अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ते सर्वात जुने व ज्येष्ठ नेते होते. दहिटणे येथील स्वामी समर्थ कारखान्याचे संस्थापक संचालक होते.काही काळ भूविकास बँकेचे ते राज्य संचालक होते. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य देखील होते व अक्कलकोट बाजार समितीचे सभापतीपद हे २००२ ते २००४ या कालावधीमध्ये त्यांनी भूषविले. नंतर पुन्हा २००४ साली त्यांनी श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद देखील भूषवले होते.

तालुक्याच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण होता. २५ जानेवारी १९९८ साली आमदार बाबासाहेब तानवडे यांचे ज्यावेळी अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांनी अक्कलकोट भाजपची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती. त्यांच्या निधनाने राजकिय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार तानवडे यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!