ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्येष्ठ पत्रकार रमेश महामुनी यांचे निधन

सोलापूर, दि.६ : जेष्ठ पत्रकार रमेश महामुनी यांचे पहाटे पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. सोलापूर येथे २९ मार्च १९३८ रोजीत्यांचा जन्म झाला. ते पुरुषोत्तम उर्फ बापूराव महामुनी आणि भागीरथीबाई महामुनी या सराफ दांपत्याचे पाचवे पुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षण जैन गुरुकुलमध्ये झाले. ते संस्कृत विषयात विशेष प्रावीण्यासह मॅट्रीक उत्तीर्ण झाले. कला शाखेचे पदवी शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झाले. सुरुवातीला शालेय शिक्षक म्हणून नोकरी केली. वडील बंधू नृसिंह महामुनी यांच्यामुळे दैनिक समाचार येथे पीटीआय बातम्यांचे भाषांतरकार म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला.

अप्पासाहेब काडादी, रंगाअण्णा वैद्य आणि रमणभाई गांधी यांच्या प्रेरणेने १९६१ मध्ये सुरु झालेल्या दैनिक संचार येथे रुजू झाले. बातमीदार , उपसंपादक,सहसंपादक या विविध पदावर दैनिक संचार मध्ये ५६ वर्षे सेवा केली. १९८३ साली महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान केला. सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाची स्थापना केली आणि अध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांनी संपादकीय लेखनासाठी त्यांना मार्गदर्शन केले. १९९० व २००० च्या दशकात दैनिक संचार मध्ये सकाळची न्याहरी हे ताज्या घडामोडी उलगडून दाखविणारे स्तंभलेखन नित्यनियमितपणे लिहिले.

सहकारी म्हणून संबोधित प्रथम पानाचे मानकरी संबोधित. त्यांना सहकारी गंगाधरराव कोठावळे, वसंतराव एकबोटे, पु. ज. बुवा, जे. टी. कुलकर्णी, काका हिरळीकर, प्रा. सि. ई. तुगावकर, दा.का. थावरे यांची उत्तम साथ लाभली. महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीवर त्यांनी काम पाहिले.पत्रकार नगर सहकारी गृह. संस्था, सिध्देश्वर सहकारी ग्राहक संस्था या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या घडामोडींचे नियमितपणे वार्तांकन केले.त्यांनी शुक्रवार पेठेतील विश्वब्राम्हण सोनार समाज कालिकादेवी मंदिर समिती आणि बाळे येथील सदगुरु आण्णामहाराज पवार स्थापित श्रीकृष्णाश्रम मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून काम केले.

१९६७ मध्ये त्यांचा विवाह अंबाजोगाई येथील कुसुम शंकरराव बारस्कर यांचेसोबत झाला. त्यांना नित्यानंद, माधुरी, विवेकानंद ही तीन अपत्ये आहेत. नातवंडांच्या संगोपनासाठी निवृत्ती घेऊन गेली चार वर्षे पुणे येथे वास्तव्यास होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!