ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : वीजेचा शॉक लागून ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे तर नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतात पडलेल्या जिवंत वीजवाहक तारांचा स्पर्श झाल्यामुळे 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) गावात घडली आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर (मेंडकी) येथील काही शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतात काम करत होते. काम करताना सकाळी 11 च्या सुमारास त्यांचा स्पर्श जिवंत वीजवाहक तारांना झाला. त्यात 4 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 2 शेतकरी गंभीर जखमी झाले. जखमींवर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत अशी या घटनेत बळी गेलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. मृतांपैकी 3 शेतकरी गणेशपूरचे आहेत, तर एक शेतकरी चिचखेडचा रहिवासी आहे.

ही घटना रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या वीजवाहक तारांमुळे घडली किंवा काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस त्या अंगानेही या घटनेची चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत वाहक तारा शेतात पडल्या होत्या. त्या तशाच राहिल्यामुळे ही दुर्घटना घडली असा दावाही या प्रकरणी केला जात आहे. पण वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश दिलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!