ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : उपमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे. शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. वास्तविक शिंदे यांना धमकीची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील त्यांना अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत.

एक महिन्यापूर्वी देखील उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांना एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. एका 24 वर्षीय तरुणाने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत त्याने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्टद्वारे त्याने एकनाथ शिंदे यांना धमकी दिली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. हितेश प्रभाकर धेंडे असे या तरुणाचे नाव होते.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांना त्यावेळी नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले होते. पोलिस आणि गृहविभागाने याबाबत दखल घेतल्याचे शिंदे म्हणाले होते. मी माझे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

या आधी एकनाथ शिंदेंना धमकी देणारा हितेश धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली वाडा या परिसरात राहतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये रात्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करणार, असे म्हटले होते. तसेच शिवीगाळही केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या हितेश धेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने श्रीनगर पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!