ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : माजी मंत्री दानवेंच्या नातूने केली उद्योजकांची १० कोटीची फसवणूक !

नाशिक  : वृत्तसंस्था 

राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाशी संबंधित एका प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्योजक कैलास आहेर यांनी तक्रार दाखल केली असून, 10 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, कैलास आहेर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, हे प्रकरण 2018 मधील आहे. तक्रारदार कैलास आहेर यांच्या कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. उद्योजक आहेर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार आणि शब्दावर विश्वास ठेवून शिवम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या कंपनीत भागीदार करून घेतले. त्यासाठी कंपनीतील 14 टक्के शेअर्स 25 कोटी रुपयांना देण्याचा व्यवहार ठरला होता. मात्र, त्यातील 10 कोटी रुपयांची रक्कम अद्याप देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप आहेर यांनी केला आहे. दरम्यान, आम्ही रावसाहेब दानवे आणि त्यांच्या नातवाची या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

या प्रकरणाबद्दल बोलताना उद्योजक कैलास आहेर यांनी गंभीर आरोप केले. “माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे साथीदार गिरीश नारायण पवार आणि त्यांच्या टीमने माझी 2018 साली फसवणूक केली.” रावसाहेब दानवे मला मुंबईत भेटले होते. मी मंत्री आहे, तुला सरकारी कामे मिळवून देईल आणि तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर दोन-पाचशे कोटींपर्यंत वाढवून देईल. तू माझ्या नातवाला पार्टनर बनवून घे, असे त्यावेळी दानवे यांनी सांगितल्याचा दावा आहेर यांनी केला आहे.

आहेर पुढे म्हणाले, इतका मोठा माणूस सांगत असल्याने आणि माझ्या कंपनीत अजून लोकांना रोजगार मिळेल या विचाराने मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना होकार दिला. त्यांनी माझ्या फॅक्टरीत भेट दिली. त्यानंतर मला माझ्या शेअर्सची किंमत विचारण्यात आली. त्यावेळी मी 14 टक्के शेअर्स मी 25 कोटी रुपयांना द्यायचे ठरवले. शेअर्सची किंमत ठरल्यावर, दानवे यांनी 50-50 लाखांचे दोन चेक मला द्यायला सांगितले. बाकीचे पैसे कधी देणार? असे दानवे यांना विचारले असता,तुला काय करायचे आहे. मी बघून घेईन, असे दानवे मला म्हणाले. इतका मोठा माणूस मला सांगत असल्याने मी त्यावेळी हो म्हटलो होतो. मात्र नंतर माझी फसवणूक झाली, असे कैलास आहेर यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!