सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जावयाच्या शेतातील बांधावरील झाड तोडून चारीत का टाकले ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासर्याला त्यांच्याच पुतण्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून व शिवीगाळ करीत छातीवर चाकूने वार करून भोसकले. गंभीर जखमी झालेल्या भुजंग सावळा रोकडे (वय ६५) यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याने दोघा पुतण्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाची घटना अर्जुननगर (ता. करमाळा) येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. तात्याबा बाबूराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबूराव रोकडे (दोघे रा. अर्जुननगर) या दोघांना करमाळा पोलिसांनी अटक केले आहे.
करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मृत भुजंग रोकडे यांची व पुतणे व जावई यांची बांधाला बांध लाूगन शेती आहे. शनिवारी भुजंग रोकडे यांचे जावई राजेंद्र घाडगे यांच्या बांधावरील लिंबाचे झाड तात्याबा व नागेश रोकडे यांनी जेसीबीच्या साह्याने तोडले व राजेंद्र रोकडे यांच्या चारीमध्ये फांद्या टाकल्या. यामुळे चारी बंद झाली हे पाहून भुजंग रोकडे यांनी त्या दोघांना चाऱ्यामधील फांद्या काढण्याच्या सांगितल्या. या वेळी “तुझा इथे बोलण्याचा काहीही संबंध येत नाही” असे म्हणून तात्याबा व नागेश यांनी भुजंग यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी भुजंग रोकडे यांच्यासोबत झालेल्या वादादरम्यान तात्याबा रोकडे यांनी खिशातील चाकूनी भुजंग रोकडे यांच्या छातीच्या डाव्या बाजूस भोकसले. या वेळी भुजंग रोकडे हे जखमी होऊन पडले, अशी तक्रार सतीष रोकडे यांनी दिली. जखमी भुजंग रोकडे यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.