मुंबई : वृत्तसंस्था
देशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता राज्यातील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गंभीर आरोप होत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदरांने पिल्ले दिले असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या पाकिटांवर ही उंदराची पिल्ले दिसत आहेत.
करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूमध्ये वापर करण्यात आलेल्या तुपामध्ये चरबी असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडू मध्ये देखील उंदीर असल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे या प्ररकणाची चर्चा सुरु झाली आहे.
या प्रकरणात समोर आलेला व्हिडिओ हा मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचे तरी षडयंत्र असल्याचे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट म्हटले आहे. या प्रकरणी कोणीतरी प्लास्टिक मध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडिओ काढला असावा, असा पलटवार स्ट्रस्टी सरवनकर यांनी केला आहे. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदीर जाण्याचा हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मंदिर प्रशासन देखील घडल्या प्रकाराची तपासणी करेल आणि योग्य ते स्पष्टीकरण देईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे पन्नास हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅम चे दोन लाडू भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केले जातात.