मुंबई : वृत्तसंस्था
नेहमीच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच या बाबत खुलासा करत सांगितले की, काही विश्वसनीय सूत्रांकडून त्यांना ‘तुमचा गेम केला जाणार’ असा इशारा मिळाला आहे. या धमकीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून, त्यांनी दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या घडामोडीची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी अमेरिकेत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या हातात काही इनपुट आले आहेत. काही लोक चर्चा करत आहेत की ‘यांचा गेम करायचाच’. त्यामुळे तुम्ही सावध राहा, असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, मला सांगण्यात आले की, धमकी देणारे जे लोक आहेत ते सेकंड रँकचे लोक आहेत. तुम्ही काळजी घ्या. प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा, गाडी चालवताना फोन स्विच ऑफ ठेवा. मला स्पष्टपणे सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही. त्यांच्या इनपुट बद्दल मला काही माहित नाही. पण मला जे फोन आला होता ते अतिशय मोस्ट सीनियर लेवल वरून फोन आला होता. आणि खात्रीलायकपणे सांगितले होते की यांचे आता अती होत आहे यांचा आता गेम करायचा.’
दमानिया यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांनी हा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळवला आहे. “या इशाऱ्याची गंभीरता लक्षात घेता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र सरकारला माहिती दिली आहे,” असे त्या म्हणाल्या.
दमानिया यांनी आणखी एक धक्कादायक बाब उघड केली. त्या म्हणाल्या, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली, त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता, असा खुलासा त्यांनी केला. त्यामुळे या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत आता चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांनंतरही अंजली दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या, “मला सिक्युरिटी घ्यायला सांगण्यात आले. पण मी दोन वेळा लिहून दिले आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी माझं सामाजिक काम सुरू ठेवणार.