मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना नुकतेच भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आता आपल्या घरी बसावे. स्वतःची शेतीबाडी पहावी. कारण, आता त्यांच्या वांग्याला चांगलेच पैसे मिळालेत, असे ते म्हणालेत.
मंत्री विखे पाटील म्हणाले कि, जनतेने त्यांना नाकारले आहे. जनाधार नसलेल्या नेत्यांनी आता घरी बसावे. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी घरी बसावे. स्वतःची शेतीबाडी पहावी. त्यांच्या वांग्याला आता चांगलेच पैसे मिळालेत. सुप्रिया सुळे यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीविषयी मार्गदर्शन करावे. कारण वांग्याचे, बटाट्याचे पैसे एवढेच त्यांचे काम आहे.
तत्पूर्वी, विखे पाटलांनी बीडच्या मस्साजोग प्रकरणी अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीत एकच खळबळ माजली होती. विशेषतः धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते.