ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बापरे : दोन महिन्याच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईने केले ठार !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरात दिवसेदिवस खळबळजनक बातम्या समोर येत असतांना आज पुणे येथील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या जुळ्या बाळांची वाढ होत नसल्याने खचलेल्या आईने दोन्ही चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले आहे. या आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत महिलेला वाचवले. दुर्दैवाने यात बाळांचा मात्र मृत्यू झाला आहे. या प्रकरणी 35 वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिला सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील मिरजवाडी येथील असून तिचा विवाह प्राथमिक शिक्षकाशी झाला होता. विवाहानंतर 10 वर्षे त्यांना अपत्य झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी अखेर टेस्टट्यूब बेबीचा निर्णय घेतला. मोठा खर्च करून दोन महिन्यांपूर्वी या दोघांना जुळी मुले झाली. ही महिला सध्या माहेरी म्हणजे दत्तनगर येथे राहत होती. मात्र बाळांची वाढ नीट होत नव्हती. त्यात तिची देखील प्रकृती खालावली. आर्थिक खर्च आणि वाढत्या तणावामुळे या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. दोन्ही बाळांना मंगळवारी सकाळी घरच्या छतावर नेत पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांना ठार केले. या नंतर उडी मारून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.

आपल्या बाळांना मारून आत्महत्या करत असतानाच कुटुंबीयांच्या लक्षात आले व तातडीने धाव घेत महिलेला वाचवले. परंतु, बाळांना वाचवता आले नाही. या प्रकरणी महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित 35 वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!