पुणे : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीची आतापासून जंगी तयारी सुरु केली असतांना यंदाच्या निवडणुकीत मुख्यंमंत्री पदाच्या नावावर अद्याप निश्चित झाले नसून नुकतेच शरद पवार यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे. शरद पवार गट मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही, असे शरद पवारांनी शुक्रवारी स्पष्ट केले. आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा. मगच मविआमध्ये जागा वाटप होईल, अशी अट उद्धव ठाकरेंनी सहा दिवसांपूर्वी जाहीरपणे टाकली होती.
काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडे असा चेहरा असेल तर सांगा. मी त्याला पाठिंबा देतो, असेही ते म्हणाले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी मान्य करणे शक्य नाही. वरिष्ठ नेते ठरवतील, असे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासगीत तरी चेहरा ठरवा, असा आग्रह धरला होता. म्हणून शरद पवारांनी पुढाकार घेत आम्ही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही, असे जाहीर केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरस राहणार आहे. शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रिपदापेक्षा आमच्या पक्षाला सत्तापरिवर्तन होणे हे महत्त्वाचे वाटते,
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा प्रदान केली. मात्र, त्यावरही संशय व्यक्त करत पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात माझी अधिकृत माहिती मिळवण्यासाठी ही सुरक्षा दिलेली असू शकते. त्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, झेड प्लस सुरक्षा दिल्याबद्दल शरद पवारांनी केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत. तसेच संरक्षण नको असेल तर त्याबद्दल राजकीय बोलण्यापेक्षा लेखी सांगावे.