सांगोला : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याच्या साथीदार गंभीर जखमी झाला. या अपघातात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना कोणतीही इजा झालेली नाही. सोलापुरच्या सांगोल्यातील माळवाड-नाझरे मार्गावर दुपारी चार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अशोक नाना वाघमारे असं मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. त्यामुळं आमदार गोरे यांना गंभीर मार लागल्यामुळं त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांला अपघात झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आणदार शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नाझरे या गावात गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सांगोल्याच्या दिशेनं शहाजीबापू पाटील यांचा ताफा निघाला असताना एका दुचाकीस्वारानं पोलिसांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळं दुचाकीस्वार अशोक वाघमारे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याशिवाय दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाला गंभीर मार लागल्यानं त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.