मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच शरद पवार गटाचे नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ‘शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं’, अशी टॅगलाईन देत प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये, असे आदेश दिले आहेत. तर आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्र्यांवर आपण टिका करायची नाही, सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची असे सुळेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
सुप्रिया सुळे काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाल्या की, राज्यात महिलांची सुरक्षा, वाढती महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. या सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एक अशी गोष्ट नाही जिथे भ्रष्टाचार झाला नाही. सगळ्यात आधी हे आम्हाला साफ करावं लागेल. या देशाची सेवा करायची आहे तर तुम्ही कोणत्या पदावर काम करता याकडे कोण लक्षं देतं. माझ्या मते राज्याचा मुख्यमंत्री असा व्हावा जो दिल्लीच्या समोर झुकलेला नाही आणि भविष्यात झुकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. तसेच कॉंग्रेस पक्षाचा नेता सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद नको आहे. हे शरद पवारांनी सांगितलं आहे. जातीय जनगणना व्हायला हवी-सुळे जातीय जनगणनेवर सुळे म्हणाल्या की, माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासूनच ही भूमिका राहिली आहे की, जातीय जनगणना व्हायला हवी. आरएसएसची हीच भूमिका राहिली तर मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करते, असेही सुळे यावेळी म्हणाल्यात.