ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदेंच्या आमदारांचा भाजप नेत्यांना लगावला टोला : बोगस माणूस बोगसच…

नागपूर : वृत्तसंस्था 

राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू असताना आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आ. अब्दुल सत्तार यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. जो माणूस बोगस असतो तो बोगसच बोलत असतो. त्यांनी जे केले ते त्यांच्या भोकरदन विधानसभा निवडणुकीत केले असेल. त्याची आठवण त्यांना येत असेल. प्रश्न असा आहे की ते दीड लाख मतांनी मग ते बोगस मत असो की सत्य मतं असो पराभूत झाले आहेत. त्यांचा झालेला पराभव ते विसरलेले नाहीत. पराभवाची आठवण झाली की त्यांना प्रत्येक वेळी अब्दुल सत्तार आठवतो, असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना लगावला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्या वेळेस माणूस निवडणुकीत पराभूत होतो त्यावेळी दुसऱ्याला कसे बदनाम करायचे हे तो पाहत असतो. परंतू त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझ्याकडे जर एकबोट केले तर त्यांच्याकडे 3 बोट असतात. शिवसेना आणि भाजपमध्ये गेली अनेक दिवस वाद सुरू आहे. या वादावर पडदा पडण्याची शक्यता असतानाच आता शिवसेनेचे माजी मंत्री सत्तार यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे पुन्हा मराठवाड्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, रावसाहेब दानवे यांचा गैरसमज आहे की लोकसभेला त्यांना मी पाडले. (हाहाहा…) मी त्यांना पाडले नाही हे सत्य आहे, ते पडले. पाडले आणि पडले यात फरक आहे. गेली 25 वर्षे आम्ही त्यांना निवडून दिले त्यावेळी त्यांना बोगस मते आणि असे काही जाणवले नाही. आता कसे समजते. मी महायुतीचा आमदार म्हणून त्यावेळी रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला होता. लोकांनी त्यांना मते दिली नाही, आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की दीड लाख मतांनी पराभूत होणाऱ्या व्यक्तीची काय लायकी असेल.

अब्दुल सत्तार म्हणाले की, जशी-जशी निवडणूक येईल तशी तशी पुढची रणनिती ठरवली जाईल. एकनाथ शिंदे हे जे बोलतील ते आमचे पुढचे पाऊल असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परिस्थिती वेगळी वेगळी असते. माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर तिथे भाजप VS शिवसेना अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही युती होणार नाही आम्ही स्वतंत्र लढू असे सत्तारांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!