पुणे : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ला येथे शिवजयंतीच्या सोहळ्याला आज गालबोट लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गडावर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शिवजयंतीनिमित्त काल मध्यरात्रीपासूनच शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पहाटेपर्यंत ही गर्दी वाढतच गेली आणि सकाळी ती लाखांच्या घरात पोहोचल्याचे चित्र होते.गडावरील अंबरखाना, हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा हे मार्ग अत्यंत अरुंद असल्याने येथे अचानक गर्दीचा दाब वाढला. एकाच वेळी हजारो लोक पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असल्याने लोक एकमेकांवर पडू लागले आणि काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
दरवर्षी शिवजयंतीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, हे माहीत असतानाही यंदा पोलिस बंदोबस्त अपुरा असल्याचे दिसून आले. अरुंद वाटांवर बॅरिकेडिंग, एकेरी वाहतूक (Entry-Exit Plan) किंवा टप्प्याटप्प्याने प्रवेशाचे नियोजन नसल्याने गोंधळ वाढल्याची चर्चा भाविकांमध्ये आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे ग्रामीणचे एसपी संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवज्योत घेऊन भाविकांचा एक गट रेलिंगवरून वेगाने खाली येत होता. तेथे तैनात पोलिस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत काही जण एकमेकांवर कोसळले. यात तिघांच्या पायांना दुखापत झाली असून एका भाविकाचा पाय मुरगळला, तर दोघांना किरकोळ जखमा झाल्या.
या घटनेनंतर भविष्यातील मोठ्या उत्सवांसाठी प्रभावी ‘क्राउड मॅनेजमेंट’, आपत्कालीन वैद्यकीय पथकांची तैनाती, सीसीटीव्ही निरीक्षण, तसेच भाविकांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी किंवा टप्प्याटप्प्याने प्रवेश व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे. गडावरील अरुंद वाटांचा विचार करून पर्यायी मार्गांचा शोध घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी भावना शिवभक्तांकडून व्यक्त केली जात आहे.