ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला राजीनामा तात्काळ मंजूर करावा – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला महापालिका सेवेचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके ह्याच शिवसेनेच्या उमेदवार असतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. अर्ज भरण्याची मुदत उद्या दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळं महापालिकेनं उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर करावा, असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी येत्या ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचारी असलेल्या लटके यांनी निवडणूक लढविण्यासाठी नियमानुसार आपला राजीनामा सादर केला होता. मात्र, त्यात त्रुटी असल्याचं सांगत महापालिका प्रशासनानं हा राजीनामा स्वीकारलाच नव्हता. त्यामुळं लटके यांना निवडणूक लढता येणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे गट महापालिकेवर दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. हाच मुद्दा घेऊन लटके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. सुमारे तासभर या प्रकरणावर सुनावणी झाली. लटके यांचा राजीनामा कधी स्वीकारायचा हा महापालिकेचा अधिकार आहे. त्यांची याचिका दखल घेण्यायोग्य नाही, असं महापालिकेचं म्हणणं होतं. मात्र, लटके यांनी नियमानुसार राजीनामा दिला आहे. तसंच, यापूर्वी नोटीस कालावधी शिथील करून राजीनामा मंजूर केल्याचा दाखलाही लटके यांच्या वकिलांनी न्यायालयात दिला. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं लटके यांच्या बाजूनं निकाल दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!