ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची ठाकरेंनी केली घोषणा

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उध्दव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र आले होते. यापूर्वी ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळं आता या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तत्पुर्वी, सुभाष देसाई यांनी युतीसंबंधी माहिती दिली. आज ऐतिहासिक घटना घडत आहे. त्याचे आपण साक्षीदार आहोत. शिवसेना-वंचित यांच्यात गेले काही दिवस चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यात अलीकडे दोन बैठका झाल्या. या दोन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की, देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. देश भरकटवण्याची रास्त भीती वाटत आहे. त्यामुळे एकत्र येण्यासाठी निर्णय घेतला आहे. भविष्यातील संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे देसाईंनी म्हंटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. त्यांनी त्यावेळेला समाजातील वाईट रुढी आणि परंपरेविरोधात प्रहार केला. परंतु आता राजकारणातील वाईट रुढी आणि परंपरांना मोडण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर घराण्यातील आम्ही वारसदार एकत्र येत आहोत. सध्या जनतेला भ्रमात ठेवून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळं आता लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र येत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

युतीची घोषणा करताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या उमेदवारांना जिंकवणं हे मतदारांच्या हातात आहे, ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात नाही. परंतु उमेदवारी देताना लोकांचं सामाजिकीकरण होत नाही. महाराष्ट्राची सत्ता सध्या केवळ ३६९ कुटुंबियांच्या आणि काही भांडवलदारांच्या हातात आहे. नात्यागोत्यांचं राजकारण सातत्यानं वाढत असून गरिबांचं राजकारण कमी होत आहे. त्यामुळं आता राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज असून त्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत येत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!