मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार आहे. मात्र काही मुद्द्यांवरून तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी शिवसेनेची आहे मात्र कॉंग्रेसचा याला विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. दरम्यान आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही असे वक्तव्य केले आहे. “सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला विचारले होते की, केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही. तसेच मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये.
“सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे,” असे ठाकरे म्हणाले होते.“वीर सावरकरांबद्दल शिवसेनेने कधीही आपली भूमिका बदलली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या भुमिकेवर टीका केली आहे. कॉंग्रेस सावरकर यांना नेहमीच विरोध करते, मात्र शिवसेना कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली आहे, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असेही फडणवीस यांनी म्हटले होते.