ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना एकसंघपणे उध्दव ठाकरेंसोबत

 

सोलापूर : शिवसैनिकांची निष्ठा ही सदैव भगव्याशी राहिलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी घडलेले शिवसैनिक कदापी ठाकरे परिवाराशी दगा फटका सहन करु शकत नाहीत. अशी कितीही संकटे आली तरी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक एकसंघपणे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच सोबत राहील असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले.
मागील चार दिवसांत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा शिवसेनेने शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, प्रकाश वानकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, सीमा पाटील, बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, संतोष पाटील, दादासाहेब पवार, अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख, दक्षिण तालुकाप्रमुख योगिराज पाटील, मोहोळचे अशोक भोसले, उत्तरचे संजय पौळ, शिवाजी नीळ, युवती सेनेच्या पूजा खंदारे, माजी नगरसेवक सदानंद येलुरे, रमेश चौगुले, रमेश व्हटकर, सुनील शेळके, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, तुषार आवताडे, परिवहनचे माजी सदस्य विजय पुकाळे, युवासेनेचे महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
बरडे पुढे म्हणाले की, आत्ताच कुणावरही टीका करणं घाईचं ठरेल. आपण संयमाने व्यक्त होऊ या. एकदा राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली की, जे पक्षाच्या विरोधात कारवाया करतील त्यांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. गद्दारांना शिवसैनिक रस्त्यावर फिरु देणार नाहीत.
जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुवाहटीला गेलेल्या आमदारांची वाट बंद केलेली नाही, त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यांनी सन्मानाने परत यावे. महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड यावेळी भावूक झाल्या व डोळ्यात अश्रू आणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचे आवाहन केले. तर माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे म्हणाले, केवळ शिवसेनाप्रमुखांच्या विचारांमुळे व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेकांना सत्तेतील मोठी पदे भोगायला मिळतात. याचा पक्षासाठी आणि पक्षातील तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांसाठी किती फायदा करुन दिला याचेही आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे. पक्षाच्या जीवावर मोठे होऊन कुणी गद्दारी केलीच, तर ती खपवून घेऊ नये.
याशिवाय प्रकाश वानकर, दीपक गायकवाड, प्रताप चव्हाण व अजय दासरी यांनीही समयोचित भाष्य केलं. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी केलं, तर आभार महेश देशमुख यांनी मानले. बैठकीस ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसह शहरातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!