ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का : हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात निवडणूक येण्यापूर्वी राजकारण चांगलेच तापले असतांना नुकतेच भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. स्वतः हर्षवर्धन यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळाले नाही, तर वेगळा पर्याय निवडण्याची संकेत दिलेत. यामुळे पुण्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

गत काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मंगळवारी पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टिट्युटमध्ये एक बैठक झाली. या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत केली.

या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की, विधानसभेची तयारी करणे हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा विषय नाही. मी कायम जनतेत असतो. आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यासंबंधी योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी इंदापूर येथेही तशी मला ग्वाही दिली होती. त्यानंतर मुंबईत सागर बंगल्यावरही मी त्यांची भेट घेतली होती. तिथेही त्यांनी मला योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पण यंदा मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही. ही चर्चा वरिष्ठ पातळीवर होते. मी त्या समितीचा सदस्य नाही. मी कोअर कमिटीचा सदस्य आहे. पण तिथेही तशी कोणतीही चर्चा झाली नाही. कालच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही अजित पवारांच्या पक्षाचे काम केले होते. पण त्यावेळीच आम्ही हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची विनंती केली होती. पण त्यानंतर राजकीय समीकरण बदलले. त्यामुळे यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार फडणवीस योग्य ते निर्णय घेतील.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तयारी करत आहेत. यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आपला वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार ते लवकरच शरद पवार गटात जातील असा दावा केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!