ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात भाजपला धक्का : माजी आमदाराचा ठाकरे गटात प्रवेश

सोलापूर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील-बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील-बिराजदार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे सोलापुरात भाजपला खिंडार पडले आहे.

मागील 10 वर्षापासून आम्ही भाजपासाठी काम करतोय, मात्र भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवलेले आहे. त्यामुळे आता आम्ही भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, असं प्रशांत पाटील-बिराजदार यांनी म्हटलं आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला अनेकजण कंटाळले असल्याचं बिराजदार यांनी म्हटलं आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्यास इच्छूक असल्याचंही बिराजदार म्हणाले.

येणाऱ्या काळात भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील, असंही प्रशांत पाटील-बिराजदार यांनी म्हटलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रशांत पाटील-बिराजदार यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केल्याने सोलापुरात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. तसेच भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, भाजपाच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आज प्रशांत बिराजदार पाटील हे ठाकरे गटात आले आहेत. त्यांच्या प्रवेशाने सिद्ध होत आहे की सोलापूर जिल्ह्यासह राज्यातून भाजप तडीपार होणार, असं ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर माजी आमदार शिवशरण बिराजदार-पाटील हे देखील लवकरच पक्षात येतील. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होईल, असंही शरद कोळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!