नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे राज्यातील विविध धरणे, नद्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटन स्थळांवर देखील मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नाशिकमधून देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजनेरी गडावर रविवारी दहा पर्यटक अडकून पडले होते. मात्र आता अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नाशिकच्या अंजनेरी गडावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १० पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे पर्यटक अंजनेरी गडावर फिरायला आले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले होते. मात्र या अडकलेल्या पर्यटकांची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली.
विशेष म्हणजे, नाशिकमध्ये प्रशासनाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. मात्र तरीही हे पर्यटक गडावर फिरण्यासाठी गेले. मुसळधार पावसामुळे अंजनेरी गडावरील पायऱ्यांवरून वेगाने पाण्याचे लोंढे वाहू लागल्याने पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर वनविभागाने धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.