ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक : शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार लंपास

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सर्व राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल ४७.६० लाख रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे बनावट शिक्के वापरुन, बोगस स्वाक्षऱ्या करुन बनावट धनादेशांच्या मदतीने ही रक्कम काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

एकूण १० धनादेश वापरून ४७.६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात फसवणूक, तोतयागिरी आणि बनावटीकरण केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमिता बग, तपन कुमार शि, झिनत खातून आणि प्रमोद सिंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, शासकीय विभागाच्या खात्यातून अशा प्रकारे चोरी होणे गंभीर प्रकार आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्याच महिन्यात शासनाच्या पर्यटन विभातूनही अशा प्रकारे चोरी झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे शासनाची खाती सुरक्षित आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!