मुंबई : वृत्तसंस्था
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून दोन वाघांच्या सलग मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर आता त्याच प्राणीसंग्रहालयातील रुद्र नावाच्या अवघ्या तीन वर्षांच्या वाघाचाही मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. सूत्रांनुसार, शक्तीच्या मृत्यूपूर्वीच रुद्रचा मृत्यू झाला होता.
रुद्र हा शक्ती आणि करिष्मा यांचा बछडा होता. राणीच्या बागेतच त्याचा जन्म झाला होता. त्याचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी अंतिम मृत्यू अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. या दोन्ही घटनांबाबत उद्यान प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासातून हेही समोर आले आहे की रुद्रचा मृत्यू झाल्यानंतरच शक्तीचा अंत झाला. मात्र दोन्ही वाघांच्या मृत्यूची माहिती उद्यान प्रशासनाने दडवून ठेवल्याचा आरोप होत आहे. “दोन वाघांचे मृत्यू लपवले का?” असा सवाल आता जोर धरत आहे.
या प्रकरणावर भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सात दिवसांत भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. रुद्रच्या मृत्यूबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, शक्ती वाघाच्या मृत्यूमागे प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा असल्याची चर्चा जोर धरत आहे. श्वसननलिकेजवळ हाड अडकून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्याच्यावर उपचार का करण्यात आले नाहीत? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनीही तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. “वाघाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असून त्याची माहिती लपवण्यात आली. व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू झाला तर वन विभाग दुसऱ्याच दिवशी कळवतो. पण येथे मृत्यू झाला तरी आठ दिवस माहिती दडवली गेली. शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच मृतदेहाची विल्हेवाट लावणेही संशय वाढवणारे आहे,” असे ते म्हणाले.
राणीच्या बागेतील या दोन वाघांच्या मृत्यूमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्राणिप्रेमींकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वाढत आहे.