ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक : दोन पोलिसांना जमावाची बेदम मारहाण, दोघेही गंभीर

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्यातील अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरून एका अज्ञात महिलेनं रेल्वे रूळावर आत्महत्या केली होती. यानंतर रेल्वे उड्डाण पुलावर अनेक नागरिक रस्त्याला अडथळा करून उभे होते. त्यांना रस्त्यावरून बाजूला करताना पोलिसांना मारहाण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिलेनं रेल्वे रूळावर आत्महत्या केली होती. मृतदेहामुळे जमाव पुलावर थांबून रस्त्यात अडथळा निर्माण करत होते. रस्ता मोकळा करण्यासाठी आणि नागरिकांना बाजूला करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे आणि पोलिस अविनाश बर्डे घटनास्थळी पोहोचले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थितीत नागरिकांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान, अचानक दहा ते बारा जणांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे आणि पोलिस अविनाश बर्डे या दोघांवर हल्ला झाला.

नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्या कर्मचाऱ्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तोफखाना पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांनी मोठ्या प्रमाणावर तपास तसेच शोधमोहीम सुरू केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!