ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक :  नगरसेवकपदासाठी इच्छुक महिलेनं केली पतीची हत्या !

पुणे : वृत्तसंस्था

 

राज्यातील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. चिंचवड पोलिस ठाणे हद्दीतील माणिक कॉलनी, लिंक रोड परिसरात शुक्रवारी (दि. २४) पहाटे हा प्रकार घडला.

 

मिळालेल्या माहितीनुसार,  सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंद भोईर (वय ४०, रा. भोईर कॉलनी, चिंचवड) यांचा त्यांच्या पत्नीने गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पहाटे अंदाजे २.३० ते २.४५ या दरम्यान घडली असून आरोपी पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

ही घटना माणिक कॉलनीतील महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाच्या इमारतीत घडली. पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होते. मयत नकुल भोईर हे पत्नी चैतालीवर चारित्र्याच्या संशयातून वारंवार वाद घालत होते. या वादातूनच चैताली हिने रागाच्या भरात नकुल भोईर यांचा कापडाने गळा आवळून खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

 

मयत नकुल भोईर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच, ते सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र म्हणून परिचित होते. नकुल भोईर आणि चैताली भोईर हे दोघेही आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

येत्या महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चैताली भोईर यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी उपक्रम व कार्यक्रम देखील नकुल भोईर यांनी घेतले होते. त्याचप्रमाणे नकुल भोईर हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होते. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावरती शुभेच्छाची पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट अखेरची ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!