ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, शहरातील नागरिकांची लसीसाठी ग्रामीण भागाकडे धाव

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१४ : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये या लसीकरण संदर्भात मोठे गैरसमज असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अक्कलकोट तालुक्यातही तेच चित्र असून याबाबत गैरसमज दूर करून या मोहिमेला गती प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करून ही चळवळ गतिमान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

अक्कलकोट तालुक्यात आज ही ग्रामीण भागातील बहुसंख्य ग्रामस्थ हे अज्ञान व गैरसमजामुळे लसीकरणापासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी ग्रामीण भागात जातात तेव्हा त्यांना कुटुंबाकडून अज्ञान व अंधश्रद्धेमुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. यासाठी सध्या ग्रामीण भागात लसीकरणा संदर्भात जनजागृतीची नितांत गरज असल्याचे मत सुशिक्षित नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या गैरसमज व अंधश्रद्धे मुळेच ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही.ग्रामीण भागात जनजागृती अभावी लस घेण्यास नागरिक पुढे येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याचाच फायदा शहरी भागातील नागरिक घेताना दिसतात.

शहरी भागातील सुशिक्षित नागरिक आता ग्रामीण भागाकडे धाव घेऊन लस घेताना दिसतात.आज ही तालुक्यातील बहुसंख्य गावातील, खेड्यातील व वाडीवस्त्यावरील नागरिकांनी कोरोना लसीकरणाबद्दल अनेक प्रकारच्या गैरसमजूत पसरवताना दिसतात. या गैरसमजूतीमुळेच लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य कर्मचार्‍यातून बोलले जात आहे.

प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरण मोहिम राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी ग्रामीण भागात नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानी घेण्याची गरज असल्याचे मत गावपातळीवरील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

आज ही तालुक्यात अशी अनेक गावे आहेत की, अशिक्षित कुटुंबाची संख्या जास्त आहे. अशा गावांमध्ये आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जातात तेव्हा त्यांना कुटुंबाकडून अज्ञान व अंधश्रद्धेमुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या भागातील लसीकरणाचे प्रमाण आज ही अत्यल्प असल्याचे दिसून येते. लस घेतल्यास मृत्यू होतो. नपुंसकता येते, महिलांना गर्भधारणा होत नाही असे अनेक गैरसमज कुटुंबातील नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने स्वीकारून प्रत्येक गावातील लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्यासाठी शासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामीण भागातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!