ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वटवृक्ष मंदिरात प्रकट दिनी स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमले

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जय घोषात हजारो भाविकांनी नामस्मरण करत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.कडक ऊन असूनही भाविकानीं रांगेत उभे राहून शिस्तीत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.यामुळे समर्थ नगरी स्वामी नामाच्या जयघोषाने दुमदुमली.यानिमित्त पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यानंतर दिवसभर स्वामींचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी सर्व भक्तांना टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात
आले.सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले.त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.यानंतर इंगळे यांच्या हस्ते व मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या वतीने आरती करण्यात आली. भजनगीत, पाळणा व आरती होऊन स्वामींचा जन्मोत्सव भक्तिभावात साजरा झाला.प्रकट दिनानिमित्त देवस्थानच्यावतीने नैवेद्य आरतीनंतर
भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले.मंदीरात भाविकांच्यावतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानच्या माध्यमातून भक्त निवास भोजनकक्ष येथे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.प्रकट दिनानिमित्त देवस्थाने
रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासली.या शिबिराच्या माध्यमातून १२८ जणांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला. गुढी पाडवा, शनिवार, रविवारच्या सलग सुट्टयांमुळे दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.यानिमित्त माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे राजे मालोजीराजे भोसले व कुटूंबीय, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव व कुटुंबीय,अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, तहसीलदार बाळासाहेब शिरसट, प्रशिक्षित सहाय्यक पोलीस अधीक्षक आश्विन कार्तिक, औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. कोरोनाच्या विघ्नामुळे तब्बल दोन वर्षानंतर मूळस्थानी हजर राहून प्रकट दिन सोहळ्याचा साक्षीदार होता आल्याने
अनेक भक्तांच्या नयनात आनंदाश्रू तरळले. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास इंगळे, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर आदींनी प्रयत्न केले.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मंदिर समिती व परिसरास चोख बंदोबस्त ठेवून विशेष सहकार्य केले.

सुंद्रीवादनाने भाविक
झाले मंत्रमुग्ध

दुपारी १२ ते १ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सोलापूरचे प्रसिद्ध सुंद्री वादक भीमण्णा जाधव यांच्या सुंद्रीवादनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.याला सोलापूरच्या व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी रसिका व सानिका कुलकर्णी यांनी साथ दिली.शास्त्रीय राग गायनाच्या सुमधुर भावभक्तिगीतांच्या गायन सेवेने उपस्थित भाविकांचा आनंद द्विगुणित झाला.

 

समाधी मठ, राजेराय मठात
भाविकांची अलोट गर्दी

प्रकट दिनाच्या निमित्ताने समाधी मठ,
राजेराय मठ तसेच बाळप्पा महाराज
मठात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.याठिकाणी तेथील स्थानिक यंत्रणेने भाविकांना सुविधा उपलब्ध करून
दिल्या होत्या.याठिकाणी उन्हाची तमा
न बाळगता भाविकांनी दर्शन घेतले.
कोरोनाचे निर्बंध हटवल्याने गर्दी
वाढल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!