ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वटवृक्ष मंदिरात दोन वर्षानंतर साजरा होणार स्वामींचा प्रकट दिन 

अक्कलकोट,दि.३१ : अक्कलकोट निवासी
श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येत्या रविवारी साजरा होणार आहे.त्यानिमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दोन वर्षानंतर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.प्रारंभी प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पुरोहीत मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस पहाटेच्या काकडआरती नंतर देवस्थानच्यावतीने अभिषेक करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४४ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पुजन होईल. सकाळी
११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य पुरोहीत पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात येईल. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात येईल.तद्नंतर वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा होत असून पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानचे विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहिले जाईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत प्रसिद्ध सुंद्रीवादक भिमण्णा जाधव यांचा सुंद्रीवादनाचा व दुपारी ४ ते ६ या वेळेत व्यंकटेश संगीत विद्यालय सोलापूर यांच्या वतीने रसिका व सानिका कुलकर्णी यांचा शास्त्रीय राग गायन व भक्ती संगीत सेवेचा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सादर होईल. तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व स्वामी भक्तांनी वटवृक्ष मंदिरातील नुतन गाभारा स्वरूपातून स्वामी दर्शनाचा, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद, भजन, भावगीत, भक्तीसंगीत सेवा इत्यादी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!