ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शुबमन गिलला वर्ल्ड कप संघातून डच्चू; विजय हजारेत संधी

मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही सामन्यांत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या शुबमन गिलला अखेर टी-20 विश्वचषक संघाबाहेर ठेवण्याचा कठोर निर्णय निवड समितीने घेतला आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने आणि वारंवार संधी मिळूनही अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट होते. मात्र, शुबमनला पूर्णपणे डावलण्यात आलेले नसून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब क्रिकेट असोसिएशनने विजय हजारे ट्रॉफीसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात शुबमन गिलसह भारतीय संघातील अर्शदीप सिंग आणि अभिषेक शर्मा यांचाही समावेश करण्यात आला आहे. या तिघांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष राहणार आहे. पंजाब संघ आपला पहिला सामना 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध खेळणार असून, अद्याप संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना संधी देत अनुभव आणि आक्रमकतेचा समतोल साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केल्याचे स्पष्ट दिसते. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपले वर्चस्व सिद्ध करणार का, याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाब क्रिकेट टीम : शुबमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), हरनूर पन्नू, अनमोलप्रीत सिंह, उदय सहारण, नमन धीर, सलिल अरोरा (विकेटकीपर), सनवीर सिंह, रमनदीप सिंह, जशनप्रीत सिंह, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, रघु शर्मा, कृष भगत, गौरव चौधरी आणि सुखदीप बाजवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!