ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शुबमन गिलच्या फॉर्मला उतरती कळा; विजय हजारेत अपयश

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार शुबमन गिल सध्या अत्यंत कठीण काळातून जात असल्याचे चित्र दिसत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिलच्या कारकिर्दीत चढ-उतार सुरू झाले असून, सध्या त्याच्या फॉर्मवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंग्लंड दौरा आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेतृत्वाखाली चांगली कामगिरी झाली असली, तरी त्यानंतर गिलच्या कामगिरीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे.

विशेषतः टी-20 फॉर्मेटमध्ये गिल पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मागील एक वर्षात त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. या सुमार कामगिरीमुळे त्याला टी-20 संघातून वगळण्यात आले, इतकेच नव्हे तर टी-20 विश्वचषक संघातूनही त्याला डावलण्यात आले. उपकर्णधार असतानाच संघाबाहेर फेकल्या जाण्याने त्याच्या कारकिर्दीवर ग्रहण लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दुखापतीतून सावरत गिल पुन्हा मैदानात परतला असला तरी फॉर्म मात्र अजूनही सापडलेला नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट पुन्हा शांतच राहिली. 12 चेंडूत अवघ्या 11 धावा करताना त्याने दोन चौकार मारून आशा निर्माण केली, मात्र पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज वासुकी कौशिकने त्याची विकेट घेतली आणि गिल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला.

आता 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेआधी गिलच्या फॉर्मची चिंता अधिकच वाढली आहे. वनडे क्रिकेटमध्येही तो अडचणीत सापडला असून 20 फेब्रुवारी 2025 पासून त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही. मागील आठ डावांत तो अपयशी ठरला असून, या काळातील 46 धावांची खेळी हीच त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

गिलप्रमाणेच सूर्यकुमार यादव याचीही अवस्था काही वेगळी नाही. शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी मिळून टी-20 आणि वनडेत एकूण 23 सामन्यांत अपयशाची मालिका कायम ठेवली आहे. दुसरीकडे, दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या श्रेयस अय्यरने मात्र आपला फॉर्म सिद्ध केला आहे. हिमाचल प्रदेशविरुद्ध त्याने 53 चेंडूत दमदार खेळी केली. तर सूर्यकुमार यादव हिमाचलविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कमी धावांत बाद झाला.

एकूणच, भारतीय क्रिकेटच्या आगामी महत्त्वाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर शुबमन गिलचा फॉर्म आणि सातत्याचा अभाव ही संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरत आहे. आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका गिलसाठी निर्णायक ठरणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!