नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात थंडीचा कहर वाढत आहे तर बंगालच्या उपसागरावर बाष्पयुक्त वारे जमा झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या १२ जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची अशीच स्थिती राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके जोमात असताना अवकाळीचं संकट तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हवामान खात्याने पुढील २४ तासांत पावसाचा इशारा दिला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पाठ सोडण्याची शक्यता कमीच आहे. बुधवारी १० जानेवारीला महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे तमिळनाडूच्या किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
मराठवाड्यासह विदर्भ, कोकण, गोवा, पूर्व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम राजस्थान या भागांत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्नाटक छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांत देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्यात अचानक पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणामुळे अनेक भागात पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा जोर ओसरला होता.