मधुबन पर्यटन क्षेत्राला विरोध दर्शवण्यासाठी अक्कलकोटमध्ये जैन बांधवांचा मूक मोर्चा, तहसीलदारांना दिले निवेदन
अक्कलकोट , दि.२१ : जैन धर्मियांचे झारखंड येथील पवित्र तीर्थक्षेत्र मधुबन हे पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आल्याने त्याचा विरोध म्हणून समस्त जैन समाजाच्यावतीने अक्कलकोट येथे मूक मोर्चा काढून तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन देण्यात आले. जैन धर्म समाज बांधवांनी थोरल्या जैन मंदिरापासून हा मोर्चा काढला. जैन धर्मियांनी त्यांचे सर्व व्यवहार बंद ठेवून झारखंड सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला.
शहराच्या प्रमुख मार्गावरून बाजारपेठेतून समर्थ चौक, सोन्या मारुती चौक, सावरकर चौक, कारंजा चौक, एवन चौक, कमला राजे चौक मार्गे जुना तहसील कार्यालय येथे जाऊन निवेदन देण्यात आले. जैन धर्मियांचे २० वे आणि २४ व्या तीर्थकरांनी मधुबन येथेच मोक्ष स्वीकारला श्री संम्मेद शिखरजी या नावाने ही पवित्र भूमी आहे. येथे पर्यटन स्थळ घोषित झाले असून त्यामुळे अनेक अवैध प्रकार उदाहरणार्थ बार, नॉनव्हेज हॉटेल्स, पब यासारख्या अयोग्य गोष्टी सुरू होतील,अशी भीती आहे. त्या होऊ नयेत म्हणून जैन धर्मियांनी पर्यटन क्षेत्राला विरोध केला आहे. हे तीर्थक्षेत्र पवित्र आहे आणि ते पवित्र राहिले पाहिजे यासाठी त्यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन पाठविले आहे.
या मोर्चामध्ये अभय खोबरे, राजेंद्र शहा, प्रवीण शहा, ॲड प्रशांत शहा, ॲड.हर्षवर्धन एखंडे , डॉ. संतोष मेहता, स्वप्निल शहा, विराग दोशी, संदेश शहा, रोहित खोबरे, डॉ.विपुल शहा, निनाद शहा, सुरज आळंद, सौरभ शहा, अनिल खोबरे, स्वप्निल आळंद,माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वप्ना शहा, माधुरी शहा, विद्या विभुते माधुरी आळंद यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो जैनबांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान अक्कलकोट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते यांनीही शहरातील समस्त व्यापाऱ्यांच्यावतीने या मूक मोर्चाला पाठिंबा देऊन ते देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जैन बांधवांनी आपापले उद्योग बंद ठेवून झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.