बीड : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना आज दसऱ्यानिमित्त राज्यात चार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर आज मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरांत पहिला दसरा मेळावा पार पडला. यावेळी जरांगे यांनी सरकारला आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, तर नाईलाजाने उलथापालथ करावीच लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला.
तुमच्या मनात जे आहे, तुमची जी इच्छा आहे, तेच आपण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. येथून जाताना आनंद घेऊन जा, आणि दुख: सोबत न्या, असे आवाहन देखील त्यांनी केले. वेळप्रसंगी मरण स्वीकारेल मात्र, तुमची मान घाली घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकर निर्णय घ्या, असे मला सांगितले जात आहे. त्यांना तयारी करायला वेळ लागणार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, गेल्या 13 महिन्यांपासून आपण तयारीच केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने आरक्षण जाहीर करावे, नसता आचारसंहिता लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे. तो पर्यंत आपण शांत राहणार असल्याचेही ते म्हणाले. राजकारणात प्रवेशाबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. आचार संहिता लागण्यापूर्वी आरक्षण मिळाले नाही तर आपण भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाने कितीही आंदोलने केली, कितीही संघर्ष केला तरी, असे दुसरे आवाहन आपल्याला दिले गेले आहे. असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी अमित शहा यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील 17 जाती ओबीसींमध्ये घालण्यात येत आहेत. मात्र, आम्हाला आमच्यात आधीच चारशेपेक्षा जास्त जाती असल्याचे आम्हाला सांगितले जात आहेत. मात्र, तुम्ही 17 जाती ओबीसींमध्ये घातल्या तर तुम्ही महाविकास आघाडीकरुन लिहून घेतले का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितले तेव्हा, आरक्ष्णाला धक्का लागत होता. आता 17 जाती ओबीसींमध्ये घालत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केले.
या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. आपण नारायण गडाचे खरे भक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण तिकडे धक्याची भाषा वापरणाऱ्याच्या नाकावर चष्मा देखील टीकणार नसल्याची टीका त्यांनी केली. मराठा समाज सहन करणारा समाज नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. हा समाज माझ्यामुळे शांत आहे तर मी या समाजामुळे शांत असल्याचे त्यांनी म्हटले मराठा समाजाची मुले प्रशासनात गेले पाहिजे. मात्र, त्यांना जाऊ द्यायचे नाही, अशी काही लोकांची इच्छा आहे. मात्र, आपण त्यांना अधिकारी पदावर नेल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मराठा समाजाने सावध व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. जर आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही तर, आपल्याला या वेळी उलथापालथ करावीच लागणार असल्याचे आवाहन देखील त्यांनी केले.