ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तर मग ठरलं : अजित पवार गट बारामती निवडणूक लढणार !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होणार असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे. या गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी शुक्रवारी आपला पक्ष बारामतीसह शिरूर, सातारा व रायगड या लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. बारामती NCP च्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना अजित पवार गटाचा थेट सामना करावा लागेल असा अंदाज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी जागा वाटपाच्या मुद्यावर आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ताकद उभी करायची आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आणायचे आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार निवडून येणे गरजेचे आहे. यात बारामत, शिरूर, सातार व रायगडमध्ये आपले उमेदवार असतील. इतर जागांवर शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल. या प्रकरणी त्यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाली आहे, असे अजित पवार याविषयी बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!