सातारा : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून महामानवांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा वाद सुरु होत असतांना नेहमीच दिसत आहे तर आता विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुद्दाम वादग्रस्त मजकूर टाकत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायबर सेलला पुन्हा आदेश देतील. जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल मानहानीकारक बोलत असेल तर राज्य सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, शहर प्रमुख निलेश मोरे, संभाजी पाटील उपस्थित होते. पत्रकारांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांना क्लीन चीट दिली असल्याचे विचारले असता ना. देसाई म्हणाले, सोलापूरकर यांना जर क्लीन चिट दिली गेली असेल तर पोलिस आयुक्तांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील आणि त्यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असताना शरद पवारांनी विरोध केला होता या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर पालकमंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत यांना पाच वर्षाने आता सुचले का? 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यानंतर 21 दिवस आम्हाला मुंबईमध्ये फिरवलं होत. एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, आम्हाला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. एका रात्रीमध्ये असं काय घडलं? संजय राऊत आता बोलत आहेत शरद पवारांचा विरोध होता. पाच वर्षांपूर्वी का बोलले नाहीत. अजून सुद्धा शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. माझं आव्हान आहे शरद पवारांच्या प्रवक्त्यांनी सांगावं आमचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी आम्हाला खाजगीत सांगितले होते की हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. संजय राऊत जर असं विधान करत असतील तर आम्हाला त्यावेळी ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बोललो होतो ती विधाने खुली करावी लागतील, असे आवाहन त्यांनी राऊत यांना दिले.