मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे विधिमंडळ पक्षाचे नेते झाले होते. त्यांना मुख्यमंत्री करण्याचे जवळपास निश्चित होते. भाजपचे 50-50 चा शब्द पाळला असता तर त्याच वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे महा विकास आघाडीतही शरद पवार आणि अजित पवार यांनी शिंदेंच्या हाताखाली आमचे नेते काम करणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्या वेळी देखील शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. महा विकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे देखील होते. मात्र, त्यांनी त्या वेळी अजिबात विरोध केला नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने त्यांचा शब्द पाळला नाही. त्यांनी बेइमानी केली. त्यामुळे महा विकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबातच्या सर्व निर्णयात एकनाथ शिंदे आमच्या सोबत हजर होते. त्यांनी कधीही विरोधी केला नाही. त्यांचे मत केवळ स्वत:ला कोणते खाते मिळते, यावर व्यक्त करत होते. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र महा विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकनाथ शिंदे हे ज्युनिअर असून त्यांच्या हाताखाली काम करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा विचार होऊ शकला नाही. हे मी आधी देखील सांगितले आहे. महा विकास आघाडी तयार करून आपल्याला सरकार बनवावे लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
धनुष्य पण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. या दाव्यावर संजय राऊत यांनी टीका केली. आज तुम्ही दिल्लीच्या दावणीला धनुष्यबाण बांधला आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांना मान्य होईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांना आत्म चिंतनाची आवश्यकता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे आपण मूळ शिवसेना बाबत किती विधान करत आहोत, त्यात किती तथ्य आणि सत्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.