मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका, म्हणजेच एक देश एक निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संसदेत मांडले जाईल. याआधी 17 सप्टेंबर रोजी गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, सरकार या कार्यकाळात ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करेल. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान म्हणाले होते की, वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळा आणत आहेत.
आता सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले आहेत. राज ठाकरे म्हणाले, ‘ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.’ ते पुढे म्हणतात, ‘पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. निवडणुकांचे महत्व इतकेच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या.