ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तर पाय उघडे पडतायेत ; ठाकरेंच्या नेत्याची जोरदार टीका

मुंबई  : वृत्तसंस्था

विधानसभा तोंडावर आली असतांना महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कि, इलेक्शन जुमल्यांवर पैसे खर्च करत सुटलेल्या महाराष्ट्र सरकारचे आता तोंड झाकले तर पाय उघडे पडत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. राज्यातील कंत्राटदारांची बिले थकल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून दानवे यांनी सरकारवर टीका केली. आज ठेकेदार जात्यात आहेत, तर सरकारी कर्मचारी सुपात आहे. मात्र, अगदी नजीकच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे या सरकारकडे राहणार नसल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे.

या संदर्भात अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालाय! इलेक्शन जुमल्यांवर पैसे खर्च करत सुटलेल्या महाराष्ट्र सरकारचे आता तोंड झाकले तर पाय उघडे पडतायेत. झालेल्या कामांची चाळीस हजार कोटींची ठेकेदारांची देयके राज्यातील महायुती सरकारने थकवली आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जल जीवन मिशन, जलसंवर्धन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पालिका, नगरपरिषदा आदी महत्वाच्या विभागांमधील बिलांचा यात समावेश आहे. लक्षात ठेवा, आज ठेकेदार जात्यात आहेत, तर सरकारी कर्मचारी सुपात. अगदी नजीकच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे या सरकारकडे राहणार नाहीत, कारण या सरकारने महाराष्ट्र दिवाळखोरीत काढला आहे!’

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!