सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूरकरांसाठी खुशखबर आहे. वर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे धावणार आहेत. यात गाडी क्रमांक (06207/08) म्हैसूर-दानापूर विशेष एक्सप्रेस सोलापूरमार्गे धावणार असल्याने सोलापूरकरांना महाकुंभ मेळाव्यासाठी जाण्याची सोय झाली आहे.
सोलापूरवरून कुंभमेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. रेल्वेचा कमी दरात प्रवास सुरक्षित व चांगला असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची कुंभमेळ्यात गर्दी असते. या मेळाव्यात अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पण, सोलापूरहून थेट रेल्वे जरी नसली तरी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर-दानापूर एक्सप्रेस सोलापूरमार्गे धावणार असल्याने सोलापूरकरांना कुंभ मेळाव्याला जाण्याची सोय झाली आहे. ही गाडी 18 जानेवारी, 15 फेब्रुवारी आणि 1 मार्च २०२५ रोजी शनिवारी दुपारी साडेचार वाजता म्हैसूर स्थानकावरून निघेल. मंगळवारी सकाळी 10 वाजता दानापूर स्थानकावर पोहचेल. तर दानापूर येथून 22 जानेवारी, 19 फेब्रुवारी आणि 5 मार्च बुधवारी मध्यरात्री १.४५ दानापूर येथून निघेल. तर म्हैसूर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता पोहचेल. या विशेष गाडीस 12 एसी- थ्री टियर कोच, 6 द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच, 2 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 2 लगेज-कम-गार्ड डबे असे एकूण 22 एलएचबी डबे असतील.
मंड्या, मद्दूर, केंगेरी, केएसआर बेंगळुरू, यशवंतपूर, तुमाकुरू, अर्सीकेरे, चिकजाजूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, बल्लारी कँट., होसपेट, कोप्पल, गदग, हुबळी, बदामी, बागलकोट, विजयपुरा, सोलापूर, कुर्डुवाडी, दौण्ड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, तलवड्या, छनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, चुनार, पी.टी. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा हे थांबे असतील.
कुंभमेळ्यासाठी म्हैसूर-दानापूर दरम्यान विशेष रेल्वे सेवा यात्रेकरू आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाने म्हैसूर-दानापूर स्थानकांदरम्यान प्रत्येक दिशेने तीन फेऱ्यांसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी सोलापूरमार्गे धावणार असल्याने सोलापूरमधूनही प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
डॉ. मंजुनाथ कनमडी, मुख्य जनसंपर्क अधिकारी दक्षिण पश्चिम रेल्वे