सोलापूर, वृत्तसंस्था
सात लाखांसाठी मुकादम बहिण भावाचे अपहरण करण्यात आले. व्हिडिओ कॉलद्वारे 7 लाखांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली आहे. तसेच या घटनेकडे अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा काळे हे मजूर पुरविण्याचे काम करतात. मजूर पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपूर येथील ऊस तोडण्यासाठी मजूर पाठवतो. यासाठी त्यांनी शिवबा हट्टी यांच्याकडून 2 लाख रुपये घेतले. परंतु मजूर न आल्याने रक्कम ते देऊ शकले नाहीत. याचा राग मनात धरून शिवबा हट्टी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार, यशोदा काळे यांचे घरातून अपहरण केले.
फिर्यादी धमाबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही. पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर त्यांची तक्रार घेण्यात आली. परंतु, अद्याप अपहरण होऊन पाच ते सहा दिवस झाले तरी देखील आरोपींना अटक केलेली नाही. या उलट आरोपी मात्र धमाबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून तिचे पती सजनू पवार यास झाडाला साखळीने बांधून ठेवल्याचा व्हिडिओ दाखवत आहेत. सात लाख रुपये दे, अन्यथा तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो, अशी धमकी देत असल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली.
भटक्या विमुक्त जातींच्या नागरिकांना नेहमी पोलीस सहकार्य करत नाहीत. अपहरण झालेल्या दोन्ही बहिण भावाच्या जीवितास धोका झाल्यास त्यास अक्कलकोट दक्षिणचे पोलीस जबाबदार असतील, असा गंभीर इशारा महिला अध्यक्षा राजश्री चव्हाण यांनी दिला आहे.