सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूर रेल्वे विभागात प्रथमच रेल्वेच्या बोगीत बसून जेवणाची संधी मिळणार आहे. यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर एका बोगीत वातानुकूलित रेस्टॉरंट बनविण्याचे काम सुरू आहे. गोवा, कोकण व केरळसारख्या सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रदेशात समुद्रात तरंगणाऱ्या बोटीतील हॉटेल प्रसिद्ध आहेत.
यामधील कॅसिनो, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येथे आकर्षित होतात. याच धर्तीवर चाकावरील हॉटेल्सही थीम घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे कोच रेस्टॉरंट किंवा रेस्टॉरंट ऑन व्हील हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या बोगीत बसून जेवण करण्याचा आनंद मिळणार आहे. त्याबरोबरच हॉटेल चालकाकडून रेल्वेला महसूलही मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासह दादर, पुणे, नाशिक, नागपूर व हुबळी येथे यापूर्वी असे प्रयोग केले असून प्रवाशांमध्ये ते लोकप्रिय ठरले आहेत. सोलापूर रेल्वे विभागात अशा प्रकारचे रेस्टॉरंट प्रथमच सुरू होत आहे. विशेष म्हणजे याचा कंत्राटदार स्थानिक असून या हॉटेलामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.
रेल्वे स्थानकावरील हॉटेल म्हटले की अस्वच्छ आणि नकोसे वाटणारे असे काहीसे यापूर्वीचे चित्र होते. मात्र रेल्वे प्रशासनाने मागील अनेक दिवसांपासून आपल्या कार्यपद्धतीत प्रचंड बदल केला आहे. यासाठी स्वच्छ व लक्झरी रेल्वे स्टेशन उभारण्यापासून प्रवाशांसाठी प्रशस्त पार्किंग, स्वच्छ व आरओचे पिण्याचे पाणी यासारख्या चांगल्या सुविधा देण्याकडे कल ठेवला आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्टेशनवर वातानुकूलित हॉटेल्स उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शाकाहारी, मांसाहारी पदार्थ मिळणार असून खवय्यांना रेल्वेच्या बोगीत बसून खाण्याचा आनंद मिळणार आहे. याशिवाय प्रवासाच्या घाईत असणाऱ्या प्रवाशांसाठी पार्सलसेवा ही देण्यात येणार आहे.
सोलापूर शहरात प्रथमच आशा प्रकारचे हॉटेल्स सुरू होते आहे. यामधून रेल्वे प्रशासनास महसूलही मिळणार असून प्रवासी व सोलापूरकर नागरिक यांच्या सेवेत एक वेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट उपलब्ध होणार आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत हे रेस्टॉरंट प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.
– योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक