सोलापूर वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. 83 वय वर्षे असताना शरद पवार यांच्या प्रचार सभा पाहून प्रभावित झालेल्या नेत्याने शरद पवार 83 फुटांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांचा मोठा चाहता वर्ग आणि कार्यकर्ते आहेत. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. शरद पवार व अजित पवार हे आता अनेक मतदारसंघामध्ये एकमेकांसमोर आले आहेत. सर्व राजकीय पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राज्यभरामध्ये दौरा केला असून उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या आहेत. त्यामुळे आता सोलापूरमध्ये शरद पवार यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
सोलापूरमध्ये शरद पवार यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात उपळवाटे गावात शरद पवार यांचा 83 फूट उंच पुतळा उभा करण्यात येणार आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते अतुल खुपसे हे शरद पवार यांच्या प्रेमापोटी हा पुतळा उभा करणार आहे. मराठवाड्यातील व विदर्भातील अनेक वारकरी या मार्गावरून जातात त्यांना हा पुतळा बघून ऊर्जा मिळेल. भविष्यात शरद पवार यांचे राज्य येणार आहे. सरकार येणार आहे, असा अतुल खुपसे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
“शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना जनशक्ती शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. कारण खरी कर्ज माफी शरद पवार यांच्या काळात झाली होती. भाजपच्या काळात कागदावरच कर्जमाफी झाली. शरद पवार यांचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. 83 वर्षांचा योद्धा आज लढत आहे. 83 वर्षांचा योद्धा लढत असताना सर्वसामान्याना ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघात उपळवाटे गावात शरद पवार यांचा 83 फूट उंचीचा पुतळा उभारणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवशी या पुतळ्याचे काम सुरु करणार आहे,”
जनशक्ती शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी पुतळ्याची घोषणा करताना मोठी भीती देखील व्यक्त केली. शरद पवार यांच्या सुरक्षेबाबत अतुल खुपसे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून हा पुतळा उभा होईल. भविष्यात पवार साहेब यांच्या जीविताला धोका आहे. शासनाने हे शोधून काढले पाहिजे. भाजपकडून 100 टक्के शरद पवार यांच्या जीविताला धोका आहे,” असा मोठा दावा अतुल खुपसे यांनी केला.